येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा... आपल्या लहानपणी हे बडबडगीत आपण सर्वांनीच अगदी म्हटले आहे. या गीताद्वारे आपण पावसाला विनवणी करायचोत. आणि पाऊसही धो -धो होऊन संततधार येऊन बरसायचा. आणि मग सर्व जग हे हिरवाईने नटायचे. नद्या-नाले ओसंडून खळखळत वाहायचे. शेतकरी राजा खुशीमध्ये हसायचा. पण हे सर्व गेल्या दहा वर्षांपूर्वी होत. आज घडीला पावसाचा लपंडाव पाहून हे सर्व लुप्त होतेय की काय याची मनाला हुरहूर लागून रहायलीये! पूर्वी पाऊस एकदा सुरू झाला की महिना-महिना उघडायचं नाव घ्यायचा नाही. त्याला पूर्वीचे आपले आजी-आजोबा पावसाचं झडगं लागलं असं म्हणायचे, आत्ताच्या या सद्यस्थितीला या झडग्याचा पत्ताच नाहीये. नेमका पाऊस गेला कुठे? याचे उत्तर शोधण्याची वेळ आपल्या प्रत्येकावर आली आहे. माझ्या मते याचे उत्तर – माणसाची बेसुमार वृक्षतोड, स्वार्थी वृत्ती, निसर्गाला प्रचंड प्रमाणात हानी हे आहे. तुमच्या मते, तुम्ही आणखी शोधू शकता. सध्या माणसाचा खटाटोप फक्त पैसा मिळवण्यासाठी चालू आहे. त्याला इतर गोष्टींमध्ये थोडासाही रस नाहीये, त्याचा जन्म फक्त पैसा मिळविण्यासाठीच झालाय या भ्रमामध्ये सध्या तो वावरतोय. आणि आपलं जीवन त्या चाकोरीत तो जगतसुद्धा आहे. पूर्वी माणसाला महत्त्व असायचं पैशाला महत्त्व नव्हतं, पैशाचा वापर अतिशय अल्प प्रमाणामध्ये काही मोजक्या ठिकाणीच केला जायचा. त्यामुळे पूर्वीच्या लोकांना माणुसकी होती, निसर्गाप्रती, एकमेकांप्रती आपुलकी होती, जिव्हाळा होता. पाऊस काळ चार महिने असायचा, सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत होती. परंतु कालांतराने माणसाप्रती, निसर्गाप्रती द्वेष भावना निर्माण झाल्या-जाग्या झाल्या. आणि मग सुरू झाला निसर्गाचा, माणसाचा -हास तो आजतागायत चालूच आहे. आणि हे सगळं घडत आहे ते पैसा रुपी राक्षसामुळे. आज घडीला हा राक्षस प्रत्येकामध्ये दडला आहे. पैसा मिळवण्यासाठी माणूस वाट्टेल ते करायला तयार होत आहे.
पैसा झाला मोठा, पाऊस झाला खोटा'...